गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून राज्य सरकारवर तोफा डागल्या होत्या. त्याचा सूड म्हणून त्यांना अटक करण्याची ही कारवाई करण्यात आल्याची टीका होत आहे. आपल्या विरोधात बोलणार्या टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे हे ठाकरे सरकारचे उपाय लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे तर आहेतच, परंतु कुठल्याही प्रकारे विचार केला तरी ते निंदनीयदेखील आहेत.
सुमारे 45 वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लादली गेली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला होता. माध्यमांची मुस्कटदाबी झाली होती आणि शेकडो विचारवंत, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांना गजाआड टाकण्यात आले होते. तेव्हाच्या सत्ताधार्यांनी या लोकशाहीतील काळ्याकुट्ट पर्वाला अनुशासन पर्व असे गोंडस नाव देऊन हुकुमशाहीचा वरवंटा फिरवला होता. अर्थात, देशावर आणीबाणी लादणार्यांना जनतेने यथावकाश धडा शिकवला. पुढे काळाच्या ओघात आणीबाणीच्या जखमा देखील बर्या झाल्या. परंतु ती हुकुमशाही मानसिकता मात्र आजही कायम आहे याचे प्रत्यंतर बुधवारी महाराष्ट्राला आले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या घरात पहाटे पाच वाजता पोलिसांचा ताफा घुसला आणि जोरजबरदस्तीने त्यांना अटक करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथे घडलेल्या एका व्यावसायिकाच्या आत्महत्येच्या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक नावाच्या एका इंटिरिअर डिझाइनरने 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामींचे नाव आहे असा आरोप आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन व्यावसायिकाच्या आत्महत्येची ही केस बंद करण्यात आली होती. अर्णब गोस्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर महापालिकेने केलेल्या तोडफोड कारवाईचा देखील त्यांनी यथेच्छ समाचार घेतला होता. ठाकरे सरकारच्या विरोधात बोलणार्यांना शिक्षा मिळायला हवी असे नव्या सत्ताधार्यांना वाटते आणि ती पुरेपूर मिळत असल्याचे दिसतही आहे. अर्णब यांच्याप्रमाणेच ठाकरे सरकारचे वाभाडे काढणार्या कंगना राणावतलाही त्याची किंमत मोजावी लागते आहे. आता अर्णब गोस्वामी यांचा नंबर लागला आहे. अटक करताना आपल्याला व आपल्या मुलाला मारहाण करण्यात आली असा दावा गोस्वामी यांच्यातर्फे केला गेला आहे. अन्वय नाईक यांची आत्महत्या दुर्दैवीच असून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु अन्वय नाईक यांना न्याय देण्याचे काम सोडाच, त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकीय भांडवल करून आपले हिशेब चुकते करण्याचा सत्ताधार्यांचा हा डाव घृणास्पद आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीकेची मोठी झोड उठवून ठाकरे सरकारला लक्ष केले यात काय चुकले? ठाकरे सरकारच्या कृत्यामुळे आणीबाणी काळाची आठवण झाली असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. महाराष्ट्रातील कारभाराची सद्यस्थिती कमीत कमी शब्दांमध्ये मांडणारा संदेश असे त्याचे वर्णन करावे लागेल. अर्णब गोस्वामी यांना सूड बुद्धीने धडा शिकविण्याचा राज्य सरकारचा हा डाव त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. 45 वर्षांनंतर आणीबाणीच्या आठवणी जागविणारा हा काळ जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.