Breaking News

पोलिसांकडून 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर

नवी मुंबई परिसरात ट्रेलरची ट्रॉली चोरणार्‍या टोळीचा तळोजा पोलिसांनी शोध लावून दोन आरोपींना अटक केली आणि 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण आठ-दहा महिन्यांपासून वाढले होते. तळोजा पोलीस ठाण्यात 12 नोव्हेंबर रोजी एक ट्रॉली चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला. याचा तपास करताना उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे व विठ्ठल दामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी एक पथक तयार करून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एक ट्रॉली वाहून नेणारा घोडा त्यावेळी जात असल्याचे लक्षात आले. त्याचा क्रमांक मिळवून मालकाजवळ चौकशी केली असता त्याने आपल्याला काही माहीत नाही, तसेच तो चालकाच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. चालकाला ताब्यात घेतल्यावर दोघांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली, तेव्हा हे दोघे रस्त्याच्या कडेला उभी असलेली ट्रॉली चोरून तिचा रंग बदलून भाड्याने देण्याचा धंदा करीत असल्याचे उघडकीस आले. यामध्ये आणखी दोन आरोपी असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, सहाय्यक निरीक्षक सुधीर निकम, उपनिरीक्षक सतीश घुगे, हवालदार थोरात, शिंदे, पाटील, चौगुले, नाईक पवार, पाटील, शिंदे, होणवार, टिके, सोनवणे, पाटील, राठोड, खेडेकर, जाधव यांनी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18 लाखांचा मुद्देमाल, उरण 14 लाख, न्हावाशेवा व पनवेल शहर प्रत्येकी सात लाख, कामोठे व हिललाइन ठाणे प्रत्येकी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेल्या मुद्देमालापैकी 11 गुन्ह्यांची नोंद झाली होती. एक गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे आरोपींकडून समजले. तीन ट्रॉली कोठून चोरल्या त्याचा तपास सुरू आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply