पनवेल : प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाच्या, नवीन पनवेल येथील श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेजमधील इंग्रजी माध्यमाच्या व विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांसाठी आदर्श विद्यारत्न पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 5) ऑनलाइन झाला. या कार्यक्रमामध्ये आरती वर्मा यांना या वर्षीच्या माहेर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगावच्या दीपस्तंभ संस्थेचे यजुर्वेद्र महाजन, मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजयजी भामरे, औरंगाबाद येथील आंतरविद्याशाखा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता डॉ. लता मोरे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगिता विसपुते उपस्थित होते.
बीएड व एमएड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी 26 उत्कृष्ट शिक्षकांची आदर्श विद्यारत्न पुरस्कारासाठी निवड झाले असल्याचे सांगितले. चेअरमन धनराज विसपुते व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब विसपुते यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमात संस्थेच्या सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.