Breaking News

पनवेलमध्ये तलाठी संघटनेचा संप, 180 गावांचे महसुली कामकाज बंद

पनवेल : बातमीदार

महाड शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये तलाठी सुभाष सोनावणे यांना अटक केली, तर महसूल कर्मचारी राजेंद्र उभारे यांचे नावही समाविष्ट केले आहे. त्याचा निषेध करून महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी पनवेल तलाठी संघाच्या वतीने सोमवार (दि. 18)पासून पनवेल तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

महाड शहर पोलीस ठाण्यात तलाठी सुभाष सोनावणे यांना अटक झाल्यानंतर तसेच राजेंद्र उभारे यांचे या गुन्ह्यामध्ये नाव आल्यानंतर पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांनी केला. त्यांचा विरोध दर्शवत सोमवारी निषेध व्यक्त केला आणि सणस यांच्या निलंबनाची मागणी केली. त्याकरिता पनवेलमधील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

सध्या संपूर्ण पनवेल परिसरात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले, त्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी स्थिती असताना पनवेलमधील सर्व महसूल कामकाज बंद पडले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सामान्य नागरिकांचे हाल

पनवेल तालुक्यातील 180 गावांचे कामकाज सोमवारपासून बंद पडले आहे. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयाबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक जण दाखले, सातबारा, फेरफार नोंदी, रेशनकार्डची कामे घेऊन कार्यालयाबाहेर आले होते, मात्र ही कामे होत नसल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे दिसले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply