Breaking News

कामोठे-कळंबोली जोडरस्त्यामुळे प्रवास होणार सुकर

पनवेल ः बातमीदार

कामोठे शहरातून बाहेर पडून थेट कळंबोलीत जाण्यासाठी बंद असलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या पाठपुराव्यामुळे सिडकोने शुक्रवारी या कामाला प्रारंभ केला. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कामोठे शहरातून बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी असलेला रस्ता अनेक वर्षे होऊ शकला नाही. भाजपने केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांनी कामोठे एक्झिट सुरू झाला. या रस्त्याच्या समोरून सायन-पनवेल महामार्गावरून कळंबोली वसाहतीत जाण्यासाठी रस्ता नव्हता. कळंबोलीतील नागरिक रेल्वेचा प्रवास करण्यासाठी मानसरोवर गाठतात. दररोज कामोठ्यात त्यांना महामार्गावरून जावे लागते. कळंबोली सेक्टर 2, 5 भागात राहणार्‍या नागरिकांना हे सोयीचे नव्हते. काही दिवस पदपथ ओलांडून बेकायदा रस्ता सुरू ठेवण्यात आला होता. हा रस्ता सुरू व्हावा, म्हणून कळंबोलीतील नागरिकांना सह्यांची मोहीम हाती घेतली होती. पदपथाच्या बाजूला असलेल्या एचपीसीएल पाइपलाईन आणि नवी मुंबईच्या मोरबे धरणाची पाइपलाईन असल्यामुळे हे काम रखडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीअभावी कामोठे आणि कळंबोली वसाहतील महामार्गावरून थेट जोडणारा रस्ता नसल्यामुळे नागरिक विरुद्ध दिशेने वाहन चालवित, कायद्याचे उल्लंघन करून कामोठे वसाहतीत प्रवेश करीत असत. अन्यथा कळंबोली कॉलनी बसथांब्यावरून वळसा घेऊन साईनगर, शिर्के कॉलनी, रोडपाली या भागात जावे लागत असल्यामुळे कळंबोलीतील दररोज रेल्वेप्रवास करणार्‍यांसाठी हा रस्ता होणे गरजेचे होते. सिडकोने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळताच कामाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नवा जोडरस्ता बांधण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी कळंबोली भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह रस्ता व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे नागरिक उपस्थित होते. सात वर्षांपूर्वी रुंदीकरण झाल्यानंतर बंद झालेला रस्ता काही दिवसांत सुरू होणार असल्यामुळे हजारो नागरिकांची यामुळे गैरसोय दूर होणार आहे. कळंबोली शहरातील फूटपाथ, गटारे, नाल्यातील गाळ काढणे, मोकळ्या भूखंडावरील डेब्रिज हटविणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे या कामांसाठी सिडको आठ कोटी 68 लाख, 61 हजार 578 इतका खर्च करणार आहे. या कामामध्ये जोडरस्त्याच्या कामाचादेखील समावेश आहे. 4 नोव्हेंबर 2020 पर्यंत या सर्व कामांची मुदत देण्यात आली आहे.

सायन-पनवेल महामार्गावर कामोठे वसाहतीच्या समोर जोडरस्ता झाल्यामुळे दोन वसाहती एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. हजारो प्रवाशांची यामुळे गैरसोय दूर होणार आहे. यापुढे सिडकोने नियोजित केलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावेत.

-भरत कोरडे, नागरिक

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply