पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई तसेच पनवेल परिसरातील अनेक विभागात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान वस्तूंची चोरी एक टोळी करीत आहे. या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा या टोळीचा माग कधी काढणार, अशी विचारणा वाहनमालक करीत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये वाशी येथे उभ्या करून ठेवलेल्या गाड्यांच्या काचा फोडून आतील लॅपटॉपसह इतर किमती ऐवज चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाच खारघरमध्ये गेल्या दोन दिवसांत 11 ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, तर पनवेल शहर परिसरातसुद्धा अशा प्रकारची घटना घडली आहे. नुकतीच अनिल कदम यांनी त्यांची सुझुकी कंपनीची अर्टीका गाडी मेरवान केक शॉप, स्पर्श हॉस्पिटलच्या बाजूला उभी करून ठेवली असता अज्ञात इसमाने गाडीच्या ड्रायव्हर बाजूच्या मागील दरवाजाची काच फोडून आतमध्ये ठेवलेली काळ्या रंगाची सॅग व त्यामध्ये असलेल्या लॅपटॉपसह इतर ऐवज असा मिळून जवळपास 50 हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 परिसरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.