पनवेल : वार्ताहर
पनवेल आरटीओने एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवून 278 वाहनांवर धडक कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे या कारवाईत 33 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सायन-पनवेल मार्गावर तसेच पनवेल भागात बेकायदेशीररीत्या प्रवाशांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाद्वारे चालविल्या जाणार्या एनएमएमटी आणि एसटी बसेसचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) लक्ष्मण दराडे यांनी दिली.
या मोहिमेत आरटीओच्या अधिकार्यांनी सायन-पनवेल मार्गावर खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल आदी भागात अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणार्या वाहनांची धरपकड केली. अशा पद्धतीने आरटीओने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या 826 लहान-मोठ्या वाहनांची तपासणी केली. या तपासणीत दोषी आढळून आलेल्या 278 वाहनांवर कारवाई करून त्यापैकी 33 वाहने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये मोठ्या बसेसचादेखील समावेश आहे.
या कारवाईत आरटीओने 65 लाख 58 हजार 802 रुपयांची करवसुली करतानाच या वाहनचालकांकडून दंड स्वरूपात 10 लाख 86 हजार रुपये असे एकूण 76 लाख 44 हजार 810 रुपये इतकी वसुली केली आहे. या कारवाईत आरटीओने 98 वाहनांची नोंदणीदेखील निलंबित केली आहे. यापुढेही अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे आरटीओचे लक्ष्मण दराडे यांनी स्पष्ट केले आहे.