उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. बुधवारी (दि. 13) रानसई धरण ओसंडून वाहू लागले. याशिवाय 117.2 फूट एवढी या धरणाच्या पाण्याची वाढली असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे. त्यामुळे उरण तालुक्याच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता या 5 ते 6 दिवस उरण तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमूळे मिटली आहे, अशी माहिती एमआयडीसी उरण कार्यालयाचे उप अभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली आहे. उरण तालुक्यातील उरण शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मे अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणाची पाण्याची पातळी अतिशय कमी होते. त्यामुळे उरणवासीयांवर पाणीकपातीचे संकट निर्माण होत असते. या वर्षी निसर्गातील बदलामुळे पावसाने उशिरा हजेरी लावली, मात्र मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. रानसई धरणाची उंची 120 फूट जरी असली तरी धरणाची पाण्याची पातळी 116.6 फूट एवढी झाली की हे धरण ओव्हर फ्लो होते. अर्ध्या अधिक उरण तालुक्याची तहान रानसई धरण भागवते. रानसई धरणातून सध्या उरण नगरपरिषद, तालुक्यातील 21 गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस् या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. मागील चार पाच दिवस उरण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या व नाल्यांना दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे येणार्या वर्षात उरणच्या जनतेला मूबलक पाणी पुरवठा होणार असल्याने जनतेने समाधान व्यक्त केला आहे.