नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऋषभ पंतचा फलंदाजीतील खालावलेला फॉर्म आणि यष्टींमागची सुमार कामगिरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने महेंद्रसिंह धोनीला डावलून पंतला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला, मात्र वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौर्यात पंतने निराशाजनक कामगिरी केली. यानंतरही पंतची आगामी विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे, मात्र ऋषभला आपली निवड सार्थ करून दाखवावी लागेल, नाहीतर संजू सॅमसन त्याची जागा घेईल, असा इशारा माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने दिला आहे.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण म्हणाला, माझ्या मते संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने ऋषभ पंतला एक संदेश दिला आहे की तुझ्या जागेसाठी संजू सॅमसनच्या रुपाने पर्याय तयार आहे. आतापर्यंत पंतला योग्य आणि पुरेश्या संधी दिल्या गेल्या आहेत. याबद्दल संघ व्यवस्थापनात नक्कीच चर्चा होत असेल, मात्र अखेरीस पंतला त्याची संघातली निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर सॅमसन त्याची जागा घेईल.
दुर्दैवाने पंतला आतापर्यंत मिळालेल्या संधीचे सोन करता आलेले नाही, पण तो चांगला खेळाडू आहे. मला आजही विश्वास आहे की तो सामन्याचे चित्र पालटवू शकतो. चेंडू मैदानाबाहेर पाठवण्याची ताकद या खेळाडूत असल्याचेही लक्ष्मण म्हणाला. मध्यंतरी भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतची खराब कामगिरी पाहता कसोटी मालिकेत त्याला विश्रांती देत अनुभवी वृद्धीमान साहाला आपली पसंती दिली. त्यामुळे आगामी टी-20 मालिकेत पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.