महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने भर पडत आहे. अशा वेळी या महामारीवर राज्यकर्त्यांकडून पूर्ण क्षमतेने उपाययोजना करणे अपेक्षित असताना तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइक त्रस्त आहेत. असे असताना मुलाखतींचा घाट घालून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे.
मुलाखत घेऊन सनसनाटी निर्माण करायची ही शिवसेनेची जुनीच स्टाईल आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही पूर्वी मुुलाखती होत असत, पण बाळासाहेबांच्या शब्दाला आणि भूमिकेला तलवारीच्या पात्यासारखी धार होती. त्यामुळे त्यांची मुलाखत गाजायची. हल्ली शिवसेनाच्या मुलाखती होतात, मात्र त्यात ना दम असतो ना दिशा. केवळ फुसका बार. शिवसेनेचे मुखपत्र दै. सामनामध्ये सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आणि आता मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची मालिका सुरू आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. कोरोना निदानासाठीच्या चाचण्या जास्तीत जास्त होणे आवश्यक असताना त्या धीम्या गतीने होत आहेत. अनेक ठिकाणी उपचारांविना रुग्ण तडफडून मरत आहेत. कुठे रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, कुठे व्हेंटिलेटर नाही. सगळी बोंबाबोब आहे. दुसरीकडे कधी लॉकडाऊन, तर कधी अनलॉक असा खेळ सुरू आहे. यात सर्वच जण भरडले जात आहेत. राज्यात उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या अपयशावरून लक्ष हटविण्यासाठी मुलाखतींचा घाट घातला गेलाय, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. कोरोनामुळे राज्यातील जनता त्रस्त असताना महाविकास आघाडीतील कुरबुरी थांबण्याचे नाव घेत नाहीये. वास्तविक या संकटात आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी तन-मन-धनाने जोरदार लढा देऊन जनतेला दिलासा देणे अपेक्षित होते. या तिन्ही पक्षांमध्ये विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिग्गज आणि अनुभवी नेत्यांचा भरणा आहे. स्वत: शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. तरीही तीन पायांची सर्कस स्वत:ला सावरण्यासाठी अद्यापही कसरत करीत आहे. एकत्र येऊन ताकद एकवटत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी इथे आपल्या पदरात काय पडते याचीच राज्यकर्त्यांना चिंता दिसते. त्यातून घटक पक्षांतील नाराजी वारंवार समोर येत आहेत. प्रसंगी वादही झडत आहेत. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कोरोनाचे वाढते आव्हान आणि त्यातच सरकारमधील वाढता विसंवाद यावरून लक्ष हटविण्यासाठी मुलाखतींचा सुरू असलेला घाट एव्हान जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळे मुलाखतींमधून विरोधकांवर राजकीय टीका-टिपण्णी करून काहीही साध्य होणार नाही. खासकरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून तर नाहीच नाही. उलट ते बुमरँग होईल. कारण कोरोनाच्या संकट काळात फडणवीस हे कोविड योद्धा बनून मैदानात उतरले आहेत. घरी न बसता ते राज्यभर फिरून दौरे करीत आहेत. रुग्णालये, कोविड सेंटर पिंजून काढून कोरोना परिस्थिती, रुग्णांची अवस्था, उपचारपद्धती जाणून घेत सरकार व जनतेपर्यंत पोहोचवित आहेत. याचीच सत्ताधार्यांना अॅलर्जी आहे आणि म्हणूनच मुलाखतींचा सारा खटाटोप घातला गेला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper