उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या वृद्धिंगत हाताळणी क्षमता आणि कार्यशीलतेसमवेत अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आज ‘पब्लिक पोर्ट ऑफ द इयर’ (कंटेनर) पुरस्कारावर त्यांचे नाव कोरण्यात आले. त्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्या सातव्या समुद्र मंथन अॅवॉर्डची माळ जेएनपीटीच्या गळ्यात पडली आहे. ‘पब्लिक पोर्ट ऑफ द इयर’ या वर्गवारीसाठी उत्पादकता, क्षमता, टनेजच्या हिशेबाने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्गोची हाताळणी, ऑटोमेशन प्रक्रिया (बचत, खर्च, वेळ इ.), भारतात कार्गोचे कव्हरेज, पायाभूत सुविधा अशा मापदंडांचा विचार झाला. आर्थिक वर्षात कंटेनर हाताळणीतील 5 दशलक्ष टीईयूचा मापदंड ओलांडणे असो किंवा सुरू असलेल्या वेगवेगळ्या पायाभूत विकास प्रकल्पांत जसे की चौथा टर्मिनल, सर्वांत मोठा रस्ते पायाभूत विकास प्रकल्प, सुक्या बंदरांचा विकास, जेएनपीटी-सेझ प्रकल्प, स्वयंचलित आणि डिजिटायजेशन सेवा, तसेच बंदर विस्ताराचे अनेक तत्सम उपक्रम व वृद्धिंगत कामकाज कार्यक्षमतेतील योगदान असो, या सगळ्याच मापदंडांवर जेएनपीटीने दिमाखदार वृद्धी दर्शवली आहे. ‘सेलिब्रेटींग हाईट ऑफ सक्सेस ऑन हाय सीज’ या संकल्पनेसोबत भांडारकर शिपिंगच्या वतीने आयोजित आणि प्रस्तुत पुरस्कार सोहळा नुकताच आंग्रीया क्रूझ शिपवर झाला.
आम्ही केलेले प्रयत्न आणि दर्जेदार सेवा यांना या पुरस्काराच्या रूपाने पोचपावती मिळाली असे आम्हाला वाटते. देशाच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्याचे ध्येय ठेवत जेएनपीटीच्या अखंड परिवाराने सातत्याने आमच्या कामकाजी कार्यक्षमतेला चालना देण्याच्या प्रयत्नात हातभार लागेल याची खातरजमा केली. जागतिक मानकांनुसार बंदराची क्षमता राहील यावर लक्ष दिले. जगभरातील बंदरात सर्वोच्च 30 बंदरांत आमचा क्रमांक लागतो. सागरी क्षेत्रात आगामी काळात परिवर्तन आणि सेवा अद्ययावत करण्याकडे आमचा भर राहणार आहे.
-संजय सेठी, चेअरमन, आयएएस, जेएनपीटी