पेण ़: प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीकच्या पुलावरून गुरुवारी (दि. 13) रात्री टाटा नेक्सन गाडी 15 फूट खाली कोसळली. या अपघातात तीन जण जखमी झाले. कल्याण येथील राजेश शशिकांत मोरे (वय 26), संध्या नथुराम पाटील (वय 19) व प्रीती दत्तू कडवे (वय 23) हे गुरुवारी रात्री टाटा नेक्सन गाडीने कल्याण येथून श्रीवर्धनकडे जात होते. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पेण येथील हॉटेल झी गार्डननजीक असलेल्या पुलावरून सदर गाडी 15 फूट खाली कोसळली. या अपघातात गाडीतील तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.