कर्जतच्या आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाइनसाठी पैशांची मागणी
कर्जत : बातमीदार
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात. या आरोग्य केंद्रांमध्ये आजारी रुग्णांना सलाइन लावायचे असल्यास पैसे मोजावे लागतात. तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे बाहेरून सलाइन खरेदी करून आणत असून तेथे बाहेरील औषधांची विक्री होत आहे.
सामान्य रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तेथे रुग्णांवर विनामूल्य उपचार करून औषधे दिली जातात. कर्जत तालुक्यात खांडस, नेरळ, मोहिली, कळंब, आंबिवली अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आंबिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच रुपये केसपेपर फी व्यतिरिक्त रुग्णांकडून सलाइन आणि इंजेक्शन यासाठी वेगळे पैसे घेतले जात असल्याचे सत्य बाहेर आले आहे. इंजेक्शन हवे असेल तर 20 रुपये व सलाइन लावायची असेल तर 60 रुपये असे या रुग्णालयातील दर असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले. आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेचा परिसरातील गोरगरीब रुग्णांना लाभ होण्याऐवजी त्यातून त्यांची लूट होत असल्याचे चित्र आहे. या आरोग्य केंद्रातील औषधेही गायब आहेत. औषधांचा साठाफलक अनेक महिने अद्यावत केलेला नाही. त्यामुळे केंद्रात औषधे आहेत असे वाटत असताना आत सर्दी, खोकल्याचीही औषधे उपलब्ध नाहीत. याबाबत आरोग्य विभागाला विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले आहेत, तर केंद्रातील डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती आणि उपाध्यक्ष असलेले सुधाकर घारे यांच्या तालुक्यातच ही लूट सुरू असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
अनेकदा आरोग्य केंद्रात औषधे नसतात. त्यावेळी औषधे का देत नाहीत म्हणून रुग्ण विचारतात. रुग्णांना बाहेरून गोळ्या औषधे आणायला सांगितली की बाहेरून का, असे प्रश्न रुग्ण विचारतात, तर आम्ही कमी पैशांत बाहेरून औषधे आणून दिली तरी आम्हाला विचारणा होते. आम्ही करायचे तरी काय?
-स्वप्नील बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी, आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र
आमची रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली. त्यात सलाइन आणि इंजेक्शनचे पैसे घेतले असल्याच्या तक्रारींवर चर्चा झाली. त्यामुळे आता झाले, पण पुढे असे होणार नाही, अशा सूचना आम्ही संबंधितांना दिल्या आहेत, तसेच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू.
-सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत
आंबिवली आरोग्य केंद्रात औषधे नाहीत, असे डॉक्टर सांगतात आणि सलाइन व इंजेक्शनचे पैसे घेऊन व्यवसाय करतात. गरीब रुग्णांची लूट जिल्हा परिषदेने थांबवावी, अन्यथा आंदोलनचा मार्ग स्वीकारावा लागेल.
-जैतू पारधी, माजी अध्यक्ष, आदिवासी संघटना कर्जत