पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबईतील मित्रांसोबत वर्षासहलीची मजा लुटण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आलेल्या राजेंद्र विश्राम शेलार याचा शनिवारी ओढासदृश नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा ओढ्यातील दगडांमध्ये अडकलेला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात महाड येथील गिर्यारोहक आणि धाडसी तरुणांना यश आले. मूळचा कुडपण येथील राजेंद्र शेलार हा मुंबईतील सांताक्रूझ येथे वास्तव्यास होता. त्याने शनिवारी वर्षासहलीसाठी त्याच्या मुंबईतील मित्र परिवाराला एका मिनीबसने कुडपणला नेले होते. तेथील पुलाजवळील ओढासदृश नदीच्या पात्रात वर्षासहलीचा आनंद घेत असताना राजेंद्र शेलार वेगवान प्रवाहामध्ये वाहून गेला. राजेंद्र शेलार बुडाल्याचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी हे कुडपणला रवाना झाले. महाड येथील सीस्केप संस्थेच्या गिर्यारोहक साहसी तरुणांना कुडपण येथे पाचारण करण्यात आले. चिंतन वैष्णव आणि सहकारी रात्रीच्या काळोखात ओढासदृश नदीमध्ये उतरले. त्यांनी मुसळधार पावसात राजेंद्रचा मृतदेह दोर्यांच्या सहाय्याने बाहेर काढला. रात्री उशिरा मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. रविवारी दुपारी राजेंद्रच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.