पनवेल ः रामप्रहर वृत्त
मातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे मोठे नुकसान झाले आहे, असे भावूक उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा कबड्डी पंच शिबिराचे आयोजन पनवेलच्या मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
शिबिरास महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाह डॉ. चित्रा पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर, प्रमुख मार्गदर्शक जे.जे. पाटील, जगदीश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, सुमित माने, नरेश म्हात्रे, जनार्दन पाटील, पनवेलचे क्रीडा प्रमुख व्ही.बी. नाईक, पंच मंडळाचे सचिव अॅड. अजिंक्य पाटील, कार्यालयीन प्रमुख अनिल कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पंचांना मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, स्वर्गीय अजितदादा हे क्रीडा क्षेत्रातील आधारस्तंभ होते. कबड्डी खेळाच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून खेळाडूंना पाच टक्के नोकरी आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पनवेलमध्ये आयोजित करण्यात येणार्या अनेक स्पर्धांना त्यांची प्रमुख उपस्थिती लाभायची. महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या अजितदादा यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली तसेच 20 ते 22 फेबु्रवारीदरम्यान होणार्या रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शिबिराला शुभेच्छा दिल्या.
राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी पंचांच्या अडचणी व तक्रारी जाणून घेत मार्गदर्शन केले. पंचांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करत संघटना पंचांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे शिबिर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत पार पडले.
Check Also
आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून १८ शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्या ठिकाणी विकास निधीतून आवश्यक …
RamPrahar – The Panvel Daily Paper