छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी
पनवेल : रामप्रहर वृत्त
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून पनवेलमध्ये महायुती आणि शिवप्रेमींनी आक्रमक निषेध नोंदवला. रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी एकत्र आले.
या वेळी उपस्थित महिलांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारत संताप व्यक्त केला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार निषेध नोंदवला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. काँग्रेस नेत्यांकडून यापूर्वीही महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला.
या निषेध आंदोलनात महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
जाहीर माफी मागेपर्यंत आंदोलन करू -आमदार प्रशांत ठाकूर
राज्याच्या भावना, इतिहास आणि सांस्कृतिक मूल्ये समजून न घेणार्या व्यक्तीची काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली, हे त्यांच्या विचारांचे दर्शन घडवणारे आहे, सतत वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ करत आहेत. जोपर्यंत ते जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिले पाहिजे. शिवजयंती काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस नेत्यांना कार्यक्रमात थारा देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper