Breaking News

त्या सत्तरीच्या ‘तरुणीं’ची धमाल : वृध्दाश्रमात आनंदोत्सव

पनवेल : प्रतिनिधी

सैंया दिल में आना रे, आके फिर न जाना रे म्हणत सुंदर नृत्य करणार्‍या त्या सत्तरीच्या तरूणी पाहून समोर बसलेल्या त्यांच्याच वयाच्या तरूण आजोबांच्या हृदयात धडधडू लागले नाही तर नवलच. त्यांच्या चेहर्‍यावर  तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटत होते. 

पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दातार इंस्टीट्यूटमध्ये  शनिवारी (दि. 29) वृध्दाश्रमातील आजी-आजोबोंसाठी संजय दातार यांनी आनंदोत्सव-11 आयोजित केला होता. वृध्द माणसे ही घरातील अडचण नाहीत. त्यांना समजून घ्या असा संदेश देण्यासाठी 11वर्षे संजय  दातार असा आनंदोत्सव साजरा करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, पेण, पनवेल, नेरे व  नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील वृध्दश्रमातील 350 पेक्षा जास्त आजी-आजोबा यामध्ये सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता गेटवर मराठी पध्दतीने दिवा ओवाळून प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते. निरनिराळे खेळ, गाणी, नृत्य, व  ड्रामा  असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले होते.    

या महोत्सवात गोरेगाव ज्येष्ठ महिलांच्या संघाने सर्वोत्तम संघाची ट्रॉफी जिंकल्याने यावर्षी नर्मदा निकेतनची हॅटट्रिक करण्याची संधी हुकली. त्यांना अभिनव दातार याचे हस्ते ट्रॉफी देण्यात आली. नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या काशीनाथ भोईर यांनी वैयक्तिक गटात मेडल जिंकले. त्यानंतर आजी-आजोबांनी आपल्या आवडीच्या गाण्यावर मनोसक्त ताल धरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र क्षीरसागर यांनी केले. चहा, नाष्टा व जेवणाचे वेळी आग्रह करून वाढणारे आणि प्रत्येकाची चौकशी करणारे संजय दातार, प्रशांत नायर, चेतना अभ्यंकर, मनीषा मॅडम, व त्यांचे सहकारी यांचे सगळे आभार व्यक्त करीत होते.

आज घरात वृध्द माणसे अडचण समजली जातात. परदेशात गेलेली मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. संजय दातार यांनी अशा आजी-आजोबांना आनंदाचे क्षण मिळवून दिले, याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

-प्रकाश विचारे,

अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल

वृध्द माणसे ही घरातील अडचण नाहीत, त्यांना समजून घ्या. आपल्या मुला-बाळांपासून लांब राहणार्‍या वृध्दाश्रमातील  आजी-आजोबांना आनंद देण्यासाठी आम्ही 11 वर्षे आनंदोत्सव साजरा करीत आहोत. येथे त्यांच्या सुप्त कला गुणांना संधी दिली जाते. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून मला समाधान मिळते. वृध्दश्रमात राहणार्‍यांना त्या वातावरणातून बाहेर आणून एक छोटीशी सहल घडवणे, त्यांना आनंद देणे, एवढाच माझा उद्देश आहे. -संजय दातार, संचालक, दातार इंस्टीट्यूट

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply