Breaking News

रायगडमधील दुर्लक्षीत कुडा लेणी

रायगड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी एक आहे, तळा तालुक्यातील कुडा येथील बौध्द लेण्या. या लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहेच, त्याचबरोबर येथील परिसरदेखील निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यापसून केवळ 24 किमी अंतरावर या लेण्या आहेत. परंतु या लेण्याची माहिती पर्यटकांना नसल्यामुळे तेथे कुणी जात नाही. पर्यटकांना महिती व्हावी, यासाठी येथे फलक नाही. लेण्यांपर्यंत पोहचण्यासाठी व्यवस्थीत रस्ता नाही.कुडा येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ती सातवाहनकालीन असावीत, असे सांगितले जाते. सातवाहन काळातील मूक साक्षीदार असलेली कुडा लेणी आज दुर्लक्षीत आहेत. शासनाने या लेण्यांचा परिसर पर्यटनाच्यादृष्टीने विकसित केला पाहिजे. तळा तालुक्यातील कुडे, मांदाड व तारस्ते या तीन गावांच्यामध्ये असलेल्या टेकडीवर या बुध्द लेण्या कोरल्या  आहेत. इ.स. तिसर्‍या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद 1848 सालची सापडते.  येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक 1 ते 15 ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक 16 ते 26 ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती.  कुड्याच्या 26 गुहांपैकी चार चैत्यगृहे आहेत. या लेण्या कोरण्यासाठी ज्यांनी मदत केली होती, त्यांची माहिती या लेण्यांच्या  भिंतींवर आणि खांबांवरील  शिलालेखात आहे. क्रमांक एकचा चैत्य पुढील विकास दाखवितो, ज्यामध्ये आपल्याला मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह या भागांनी युक्त मंदिर पहावयास मिळते. स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ हे येथे आढळणार्‍या स्थापत्यशैलीतील नवे वैशिष्ट्य आहे. अंतराळामध्ये भिंतींलगत बसण्याकरिता ओटे केलेले दिसून येतात. लेखातील अक्षरे प्रयत्नपूर्वक आकर्षक आणि सुबक वळणाची आहेत. चैत्य क्र. सहा हा सर्वात मोठा आणि सर्वात चांगला चैत्य आहे. चार चैत्यांव्यतिरिक्त कुडा येथे एक मंडप आणि एकवीस विहार आहेत. मध्यभागी चौरसाकृती सभागृह अथवा मोकळी जागा आणि चारही बाजूंना खोल्या आहेत. लेणीपर्यंत जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते, म्हणून खूप वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. लेणीजवळ मांदाड बंदर आहे. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी सांगितलेले मँडागोरा बंदर. मांदाड येथील उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची विटा व खापरे सापडले आहेत. हे सातवाहन साम्राज्यात महाभोजांच्या मांदव घराण्याचे केंद्र होते. ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहे. येथे पोहचण्यासाठी चांगला रस्ता नाही. कुडे व तारस्ते येथून या लेण्यांपर्यंत पाहचण्यासाठी मार्ग आहेत. त्यापैकी तारस्ते येथून जाणारा मार्ग सोपा आहे. मात्र हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. यावून वाहन जाऊ शकत नाहीत. मुरूडच्या जंजिरा किल्ल्यापासून काही किलोमिटरवर या लेण्या आहे. लाखो पर्यटक या जंजिरा किल्ल्याला भेट देतात, त्यासाठी दिघी-माणगाव मार्गावरून हजारो पर्यटक प्रवास करतात. परंतु या कुडा लेण्यांकडे कुणी जात नाही. करण येथे लेण्या आहते, हेच कुणाला माहित नाही. या मार्गावर कुडा लेण्याचीं माहिती असलेले फलक नाहीत. इतकेच नाही तर तारस्ते येथेदेखील शासनाने फलक लावलेला नाही. निदान लेण्यांची महिती असलेले फलक या मार्गावर लावले तर पर्यटक नक्की या लेण्यांमध्ये जाऊ शकतील. लेणीकडे जाण्यासाठी कुडा गावातून एक मार्ग आहे. तो थोडा अवघड आहे. याच गावातून कुडा लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता मंजूर झाला आहे. परंतु जागा वनखात्याची आहेे. वनखाते यासाठी परवानगी देत नाही. ही परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हा रस्ता होणे गरजेचे आहे. कुडा लेण्यांच्या परिसरात  अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत म्हणून, या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करावा, अशी मागणी  गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिक करत आहेत. परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाने मान्यता  दिल्याचे सांगण्यात आले होते.  परंतु पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. कुडा लेणीचा विकास आणि संवर्धन पुरातत्व विभागाच्या नियमांच्या आधीन राहून अधिक चांगल्या पध्दतीने करता  येणे शक्य आहे. लेण्यांच्या वरच्यास्तरावर गेल्यावर तेथून समोर खाडीचा परिसर दिसतो. या लेण्यांविषयी माहिती नसल्यामुळे पर्यटक या लेण्यांकडे वळत नाहीत. ते जंजिरा किल्ला पाहून मागे वळतात. कुडा लेण्यांना जास्तीतजास्त पर्यटाकांनी भेट द्यायला हवी. येथे पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास पर्यटक या लेण्या पाहण्यासाठी येतील. पर्यटन व्यवसायातून या भागातील भुमीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध  होतील.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply