मुरूड : प्रतिनिधी
सध्या देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविषयी गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.
यासंदर्भात व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येणार्या मेसेजवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी रविवारी (दि. 1) येथे केले.
मुरूड पोलीस ठाण्यामध्ये रविवारी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार बोलत होते. व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त पोस्ट टाकून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांवर तातडीने गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गावात कोणी अनोळखी इसम अथवा सर्व्हे करण्यासाठी माणसे आली असतील, तर पोलिसांना प्रथम कळवावे, परंतु चुकीच्या माहितीच्या आधारे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका, अशा सूचना रंगराव पवार यांनी या वेळी केल्या.नगराध्यक्ष स्नेहा पाटील, उपनगराध्यक्ष नौसिन दरोगे यांच्यासह नगरसेवक व शांतता समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.