पनवेल : बातमीदार
शिवसेनेच्या सीबीडीतील नगरसेविका सरोज पाटील यांचा दीर नीळकंठ पाटील याने त्याच्या ओळखीतील अनुसूचित जातीच्या 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची तक्रार बदलापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. हा प्रकार सीबीडी परिसरात घडला असल्याने बदलापूर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा पुढील तपासासाठी सीबीडी पोलीस ठाण्यात वर्ग केला. पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तक्रार मागे घ्यावी, यासाठी नीळकंठ पाटील याचे मोठे बंधू नवी मुंबई शिवसेनेचे उपशहर प्रमुख रोहिदास पाटील व त्यांची पत्नी नगरसेविका सरोज पाटील हे आपल्यावर दबाव आणून धमकावत असल्याची तक्रारदेखील पीडितेने केली आहे. त्यानुसार सीबीडी पोलिसांनी नीळकंठ पाटील याच्यावर बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच रोहिदास पाटील व त्यांची पत्नी सरोज पाटील, नीलेश मढवी यांच्यासह चौघांना या प्रकरणात सहआरोपी केले आहे. भाऊ व माझ्याविरोधात बलात्कार व अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे रोहिदास पाटील यांनी सांगितले.