Breaking News

शेतकर्‍यांचे नष्टचर्य

सलग तिसर्‍या वर्षी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सामोरे जावे लागले आहे. या अवकाळीमुळे रब्बी हंगामाचे बव्हंशी पीक हातून निघून गेले आहे. तर, गारपिटीमुळे डाळिंब, सोयाबीन, द्राक्ष अशा अनेक पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. आधीच्या संकटातून पुरते सावरता आलेले नसताना आणखी एका अस्मानी संकटाला महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागले, ही अवस्था भीषणआहे. निसर्गाच्या अनाकलनीयरित्या बदलत्या चक्रामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची सुरू असलेली परवड थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. बदलते हवामान तर शेतकर्‍याला छळते आहेच, पण त्याच बरोबरीने राज्याच्या राजकारणातील अलीकडचे बदलही शेतकर्‍यांच्या मुळावर आले आहेत. ‘अस्मानाने मारले आणि सुलतानाने झोडले तर जायचे कुठे’ असा आर्त सवाल महाराष्ट्रातील शेतकरी गेली अनेक वर्षे करत आहेत. परंतु राज्यकर्त्यांच्या कानावर त्यांचा आवाज कधी आणि कसा पडणार, कुणास ठाऊक? निसर्गातील बदल कधीच कुणाच्या हातात नव्हते. निसर्गचक्रात ढवळाढवळ मात्र मनुष्यप्राण्याला काही प्रमाणात जरुर करता आली आहे. अर्थात त्याची जबरदस्त किंमत निसर्ग मोजायला लावतो आहे. सध्या हवामानबदलाची असंख्य उदाहरणे आपण पाहात किंवा ऐकत आहोत. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्यांचे वितळणे असो वा पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायुच्या कवचाला भगदाडे पडण्याचे वैज्ञानिक पुरावे असोत, एल निनो घटकाचे परिणाम आणि दुष्परिणाम असोत किंवा वारेमाप जंगलतोडीमुळे निसर्गाचे बिघडलेले संतुलन असो या सार्‍या गोष्टी विज्ञानाने मानवाला ज्ञात करून दिल्या असल्या तरी कळते पण वळत नाही अशी माणसाची अवस्था आहे. पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्राच्या अन्य काही भागांत शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचे स्वरुप अशाच नैसर्गिक असंतुलनाचा दुष्परिणाम आहे. राज्याच्या विविध भागांत शनिवारी आणि रविवारी बसलेल्या अवकाळीच्या तडाख्याचा फटका सोलापूर, नगर, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, वाई, सातारा आदी ठिकाणी बसला आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे सक्रिय झाल्याचा हा अवघा परिणाम आहे. मध्य प्रदेश ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवतो आहे. त्यामुळेच राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होऊन अवकाळीचा तडाखा बसला आहे. काही भागांत गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांनाही गारपिटीचा मारा सोसावा लागला आहे. मागील फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अभूतपूर्व अशी कर्जमाफी योजना आणली होती. त्याचा लाभ लाखो शेतकर्‍यांना झाला. परंतु कोल्हापूर, सांगली भागात आलेला महापूर आणि सर्वदूर झालेला अवकाळी पाऊस यांची तड लावण्याआधीच दुर्दैवाने फडणवीस सरकार गेले. राजकीय डावपेच लढवून जोरजबरदस्तीने सत्तेवर आलेले ठाकरे सरकार शेतकर्‍यांसाठी तातडीने काही पावले उचलेल असे वाटले होते, परंतु त्या आघाडीवर देखील या सरकारने सर्वांचीच सपशेल निराशा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाजतगाजत शेतकर्‍यांच्या ‘कर्जमुक्ती’ची घोषणा केली खरी, आणि लाभार्थी शेतकर्‍यांच्या दोन याद्या देखील प्रसिद्ध झाल्या. परंतु प्रत्यक्षात कुणाच्याही हातात काहीही पडलेले नाही. स्वत:ची खुर्ची टिकवण्यातच या तीन चाकी सरकारची शक्ती खर्ची पडत असल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍याला अक्षरश: वार्‍यावर सोडण्यात आले आहे. अस्मानी संकटानंतर आलेले सुलतानी संकट म्हणजे हे नवे सरकार असेच म्हणावे लागेल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply