अलिबाग : प्रतिनिधी
गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची संगता अनंत चतुर्दशीला झाली. त्यानंतर शनिवारी (दि. 5) आलेल्या संकष्ट चतुर्थीला रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. साधारणत: दीड दिवसाच्या मुक्कामानंतर रविवारी (दि. 6) या बाप्पाला निरोप दिला जाईल.
रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणार्या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग या तालुक्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो.
पेण तालुक्यात मोठ्या संख्येने गणेश कार्यशाळा आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत काम चालत असते. त्यामुळे या कारागिरांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्याचप्रमाणे विक्रेते, व्यापारीही मूळ गणेशोत्सवात व्यस्त असतात. त्यांनाही गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करता यावी म्हणून साखरचौथीच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याचे काही जण सांगतात. काहीच्या मते कोकणात घरगुती गणेशोत्सव साजरा होत असतो, पण येथील भाविकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. ही संधी सर्वांना मिळावी या हेतूने या उत्सवाची सुरुवात झाली, असे सांगितले जाते.
रायगड जिल्ह्यात गौरा गणपती उत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. 22 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू झाला. 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीला आलेल्या 21 दिवसांच्या गणपतींचा अजनूही काही ठिकाणी मुक्काम आहे. असे असतानाच 5 सप्टेंबर रोजी गौरा गणपतींचे आगमन झाले आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper