म्हसळा : प्रतिनिधी
शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या (तहसील, वन विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, उपकोषागार, मंडळ व तलाठी कार्यालय) स्वच्छतागृहांचे सांडपाणी कार्यालयाच्या मुख्य मार्गावर येत असल्याने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी भरून राहिली आहे.
वास्तविक शहरांत स्वच्छता राखावी, संडास, मुतारीचा वापर पुरेपूर व्हावा, यासाठी नगरपंचायतीने संपूर्ण म्हसळ्यातील शासकीय भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी घोषणा लिहिल्या आहेत, स्वच्छता अभियानासाठी मोठा निधी खर्च केला आहे, मात्र दिव्याखाली आंधार असल्याप्रमाणे वरून कीर्तन आतून तमाशा अशी स्थिती म्हसळा शहरातील स्वच्छतेची झाली आहे. नगरपंचायतीकडे शहरांतील सार्वजनिक व नागरी स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी एक निरीक्षक आहे, तरीही बहुतांश ठिकाणी स्वच्छतेबाबत दुर्लक्षच होत असते. त्याच पद्धतीने शासकीय इमारतींची देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेबाबतची कामे करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असूनही या दोन्ही यंत्रणांचे सार्वजनिक आरोग्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे
म्हणणे आहे.
म्हसळ्यातील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सार्वजनिक शौचालयांची झालेली दुरवस्था नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविणार आहोत.
-के. टी. भिंगारे, नायब तहसीलदार, म्हसळा