Monday , February 6 2023

उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, त्यासाठी शुभेच्छा!; सोमय्यांचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील एक पत्रक शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी जारी केले आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. लोकायुक्तांनी परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाची माहिती देण्यासाठी सोमय्या यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. परिवहनमंत्री परब यांचे कार्यालय तोडण्याचे आदेश देण्यात आले असून लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब यांच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिल्याचे सोमय्या यांनी या वेळी सांगितले. याच पत्रकार परिषदेमध्ये सोमय्यांना शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सोमय्या यांनी या सर्व घोषणा राज्यातील घडामोडींवरून लक्ष्य विचलित करण्यासाठी केल्या जात असल्याचा दावा केला. यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना 100 मतेही पडली नव्हती, असा टोला लगावला, तसेच पुढे हसत त्यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असे म्हटले.

403 की 100 जागा लढविणार?


मुंबई ः शिवसेना उत्तर प्रदेशमधील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे तेथील नेते ठाकूर अनिल सिंह यांनी केली आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र पक्ष 100 जागांवरच लढणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना नक्की किती जागा लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेना नेहमीच उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किती जागा लढवणार याचा आकडा फुगवून सांगत असते. प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची वेळ येते तेव्हा मात्र 100च्या आतच जागा लढवत असते. त्यामुळे शिवसेना ज्या घोषणा करते त्यात नवीन काही नाही, असे सूत्रांनी सांगितले. 2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 57 जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी 56 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply