Breaking News

कोरोनामुळे जिल्ह्याच्या जनजीवनावर परिणाम; म्हसळ्यातील बाजारपेठेत शुकशुकाट; नागरिक सतर्क

म्हसळा : प्रतिनिधी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील सात दिवस धोक्याचे असून, नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशा पद्धतीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नगरपंचायत विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती केल्याने गुरुवारी  (दि. 19) म्हसळा बाजारपेठेत गर्दी कमी झाल्याचे चित्र होते, प्रवासी वाहतूकसुद्धा निम्म्यावर

आली होती.

गर्दी टाळणे हा कोरोना रोखण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. त्यादृष्टीने म्हसळा नगरपंचायतीने दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन महापौर जयश्री कापरे यांनी केले आहे. कोरोनाच्या धसक्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक शिक्षण विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस दल यांचे कर्मचारी, आशा अंगणवाडी सेविका, खासगी  व्यावसायिक, पॅथॉलॉजिस्ट ही मंडळी महसूल विभागाच्या समन्वयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे काम करीत आहेत. नागरिकही खबरदारी घेत गर्दीच्या ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे सध्या म्हसळा बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे.

उत्तरकार्य व दशक्रियेसाठी फक्त पाच माणसांनाच मुभा उद्धर येथील रामेश्वर महादेव देवस्थानची खबरदारी

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर महादेव देवस्थानातर्फे 31 मार्चपर्यंत उत्तरकार्य व दशक्रिया करण्यासाठी फक्त पाच किंवा सहा माणसांनी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच तेथे जेवण बनविण्यास मनाई

केली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देवस्थानमार्फत हे आवाहन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र उद्धर येथे जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील लोक दशक्रिया व उत्तरकार्य विधीसाठी मोठ्या प्रमाणात येतात, मात्र 31 मार्चपर्यंत हे विधी करण्यासाठी येणार्‍या नातेवाइकांनी आवश्यक  तितक्याच म्हणजे पाच- सहा माणसांची उपस्थिती ठेवावी, ज्यामुळे सदर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, असे आवाहन रामेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष रवींद्र नारायण लहाने आणि विश्वस्त कमिटीने सर्वांना केले आहे. आता या आवाहनाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply