केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व राज्यांत लॉकडाऊन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत.
काही राज्यांत अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण जनता कर्फ्यू यशस्वीपणे पाळल्यानंतर सोमवारी (दि. 23) पुन्हा अनेक लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून आले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीत सर्वच राज्यांना लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. 22 राज्यांतील 75 जिल्ह्यांमध्ये 31 मार्चपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे.
पंतप्रधानांचे आवाहन
कोरोनाशी लढा देण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही काही लोक याला गांभीर्याने घेत नाहीएत. कृपा करून तुम्ही स्वत:ला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा आणि सूचनांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे केले. याबरोबरच राज्यातील सरकारांनी लॉकडाऊनचे नियम आणि कायद्याचे लोकांना पालन करण्यास भाग पाडावे, असे निर्देशही पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.