Breaking News

अखेर महाराष्ट्रात संचारबंदी लागू

जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचेही आदेश

मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 23) केली. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. त्याचप्रमाणे  राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
आज अनेक भागांत लोकांनी रस्त्यावर उतरून विनाकारण गर्दी केल्याचे, तसेच वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केेले.
ते पुढे म्हणाले की, राज्याच्या सीमा आपण रविवारी बंद केल्या होत्या. आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येत आहेत. राज्यातील सगळी प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजार्‍यांनाच प्रवेश दिला जाईल. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल मी राज्याच्या जनतेला धन्यवाद देतो, असेही त्यांनी सांगितले.
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्मिती करणारे कारखाने, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. बेकरी सुरू असेल. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहणार आहे. याशिवाय टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन आणि रिक्षामध्ये चालक अधिक एक अशी मर्यादित संख्या असेल. तीदेखील अत्यंत महत्त्वाची असेल तरच परवानगी दिली जाणार आहे.
संचारबंदी (कर्फ्यू) म्हणजे काय?
संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लावले जातात. त्यास ’कर्फ्यू’ असेही म्हटले जाते. कलम 144मधील तरतुदीनुसार जमावबंदी आणि संचारबंदी लागू होते. संचारबंदी लागू झाल्यास निवडण्यात आलेली ठिकाणे किंवा परिसरात नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात येत असते. आपत्कालीन परिस्थितीतही त्याचा वापर करण्यात येतो. संचारबंदी लागू होताच सर्व अधिकार जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांकडे येतात. कलम 144मध्ये कर्फ्यू लावण्याची तरतूद आहे. याचे उल्लंघन केल्यास कारवाई होते. नियम मोडल्यास कोणालाही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असतात.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply