रस्त्यांवर संदेश लिहून नवी मुंबई पालिकेकडून जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका चिंतेत आहे. त्यात दिल्लीतील ताब्लिगी कनेक्शन उघड झाल्याने अनेकांचा शोध सुरू आहे. तर अनेकांना शोधण्यात व क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवी मुंबईकर जनता पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असली तरी पालिकेने विविध रूपांत आपली जनजागृती सुरूच ठेवली आहे. त्यानुसार नवी मुंबईतील नेरुळमधील अनेक मार्गांवर मोठया अक्षरांत संदेश लिहून जनजागृती केली जात असून सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी देखील कौतुक केले आहे.
मुंबई ठाण्यानंतर नवी मुंबईला देखील कोरोनाचा विळखा पडलेला आहे. त्यात अत्यावश्यक सेवेत मोडले जाणारी बाजारपेठ सुरू आहे. राज्यांतील इतर जिल्ह्यांमध्ये बाजारपेठा बंद असल्याने वाशी बाजार पेठेत राज्यांतून आवक सुरू आहे. त्यात वाशीत फिलपाईन्स नागरिकाकडून अनेकजणांना कोरोनाची बाधा झाल्याने आकडा वाढलेला असतानाच दिल्लीतील मरकज तबलीगीत सामील झालेल्यांचे नवी मुंबई कनेक्शन उघडे झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नगरीला चांगलेच धास्तावले आहेत. मात्र कितीही झाले तरी नागरिक अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडत आहेत. पोलीस देखील सर्वत्र फिरून बंदोबस्त ठेवून नागरिकांनी घरात राहावे यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांची पाठ वळताच नागरिकांचे दर्शन होत आहे.
अखेर अशा बेशिस्त नागरिकांना उपदेशाचे डोस पाजण्यासाठी पालिकेने थेट गर्दीची ठिकाणे असलेल्या रस्त्यांवर भल्या मोठ्या अक्षरांत संदेश लिहिण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नेरुळ सेक्टर 2 राजीव गांधी पुलाखाली तर सायन पनवेल महमार्गांवर एल पी उड्डाणपुलाखाली असे संदेश लिहिण्यात आले आहेत. आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब व देशाला धोक्यात आणत आहात. नवी मुंबई महापालिका, घरात राहूया, कोरोना टाळूया असा संदेश लिहीत पालिकेने हात जोडण्याचे चिन्ह देखील रस्त्यांवर काढले असल्याने अखेर पालिकेने बेशिस्त नागरिकांसमोर हात टेकले असेच म्हणण्याची वेळ पालिकेवर आली आहे.