- मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
- आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त
भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेश बालदी यांना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार मंगळवारी (दि. 22) मुंबई येथे मंत्रालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी मंत्रीमहोदयांनी उपस्थितांना आश्वासित केले.
या बैठकीस आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय जैसवाल, सदस्य सचिव अभिषेक चव्हाण, मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे, मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता चंद्रकांत गजभिये, कार्यकारी अधिकारी व्ही. के. सुर्यवंशी, कर्जत उपअभियंता एस. आर. भोसले, पनवेल उपअभियंता के. बी. पाटील, प्रशासन अधिकारी जे. के. कोळी, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आहे. या केंद्रात गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या पदांवरील अनेक कर्मचारी काम करीत असून या सर्व कर्मचार्यांना पगाराव्यतिरिक्त कोणत्याही सवलती आजपर्यंत दिल्या गेल्या नाहीत. या प्रकरणी उच्च न्यायालयातदेखील सन 2007मध्ये निकाल दिला गेला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कामगार मंत्रालय यांनी सहा महिन्यांत निर्णय घेऊन त्यांची देणी अदा करावीत असे आदेश दिले होते, पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत प्राधिकरणने अधीक्षक अभियंता यांच्यासोबत बैठकीमध्ये अधीक्षक अभियंता यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी यांना पत्रव्यवहार करून या जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांना नियमित करून घेण्याबाबत पत्रव्यवहाराने कळविले आहे, मात्र आजपर्यंत प्राधिकरणने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी केली होती.
या संदर्भात मंत्रीमहोदय, संबंधित विभागाचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी कामगारांच्या व्यथा मांडताना तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार मंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात प्रयत्नशील राहून कामगारांना न्याय देण्याचे आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे आमदार महेश बालदी यांनी सूचित केल्याप्रमाणे येत्या आठवड्यात दोन वर्षांचा बोनस कामगारांच्या खात्यात जमा करणार असल्याचे सांगितले. याशिवाय भविष्य निर्वाह निधीची थकबाकी रकमेसंदर्भातील विषयही मार्गी लावण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.