पनवेल : बातमीदार
अवघ्या देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याशिवाय, विविध प्रतिबंधात्मक कलम लावून नागरिकांना घराबाहेर पडणे व गर्दी करण्यावर अंकुश लावण्यात आला आहे. सरकारने या संदर्भात लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील मोठी धामणी आणि हौशाचीवाडी येथील आदिवासींना दोन टनपेक्षा अधिक मालाचे वाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिक घरी बसून आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे आदिवासींचा रोजगारदेखील बंद झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभाग उपआयुक्त सुनिल चव्हाण व रायगड अधीक्षक सीमा झावरे यांच्या आवाहनानुसार राज्य उत्पादन शुल्क, पनवेल विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे, ग्रामीणचे वामन चव्हाण, भरारी पथकाचे एस गोगावले यांनी तालुक्यातील मोठी धामणी आणि हौशाची वाडी येथील आदिवासींना 10 किलो तांदूळ, एक किलो तुरडाळ, मसूरडाळ, कांदे बटाटे, साखर, चहा, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 13 एप्रिल रोजी केले. पनवेलपासून जवळपास वीस ते 22 किलोमीटर दूर असलेल्या या वाड्यांवर सोशल डिस्टन्स आणि चेहर्यावर रुमाल बांधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्यासह त्यांचे पथक उपस्थित होता.