पनवेल : रामप्रहर वृत्त
नाकाबंदीदरम्यान खांदेश्वर पोलिसांनी 135 हून अधिक गाड्या जप्त केल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. शिंदे यांनी दिली. सुकापूर, आदई सर्कल, एचडीएफसी सर्कल, रेल्वे स्टेशन, खांदा कॉलनी, शिवाजी चौक अशा विविध ठिकाणी नाकाबंदी करून 135 रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. लॉकडाऊन सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या प्रमाणात आपली वाहने घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. या नाकाबंदीदरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणार्या वाहनांना जाऊ दिले जात आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणार्या व विनाकारण फिरणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
ऑनलाइन व्याख्यानांची विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून दखल
पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत, पण यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून झूम अॅपचा वापर करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डीएसएमच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन व्याख्याने विसपुते बीएड महाविद्यालयात सुरू केल्याबद्दल प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांच्या कामाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी कौतुक केले. नवीन पनवेलमधील आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या प्रेरणेने विसपुते बीएड महाविद्यालयात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत, पण यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून झूम अॅपचा वापर करून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी बीएडच्या विद्यार्थ्यांसोबतच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या डीएसएमच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन व्याख्याने सुरू केलीत. त्याला विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.महाविद्यालयाच्या या कार्याची दखल मुंबई विभागीय संचालक डॉ. नाकले व रागिणी पाटील यांनी घेऊन ही माहिती नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे पाठविली. या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी विद्यापीठाच्या फेसबुकला ही बातमी टाकली. या कुलसचिव दिनेश भोंडे यांनी एक ऑनलाइन मिटिंग घेऊन विसपुते महाविद्यालय व प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांचे कौतुक करत इतर सर्व केंद्र संयोजकांना अशी व्याख्याने घेण्यासाठी प्रेरीत केले आहे.
सुरक्षा रक्षकाचा आढळला मृतदेह
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आजिवली गावाच्या रस्त्यावर एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (दि. 14) सकाळी आढळून आला आहे. ही व्यक्ती त्या परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील गावाच्या रस्त्यावर एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची खबर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना मिळताच त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल कारोटे व पथक घटनास्थळी रवाना झाले होते. घटनेची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण मध्यवर्ती शाखा तसेच गुन्हे अन्वेषण युनिट 2, पनवेलचे पथकसुद्धा घटनास्थळी पोचले. परिसरात अधिक चौकशीत हा व्यक्ती हा सुरक्षारक्षकाचे काम करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्याच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. या व्यक्तीला कोणी मारले असावे व कारण काय याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
कामोठे पोलीस ठाण्यात सॅनिटायझेशन कक्ष
पनवेल : वार्ताहर
कामोठे पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त नवी मुबई यांच्या संकल्पेनेतून कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात एक सॅनिटायझेशन कक्ष उभारण्यात आला असून. या कक्षाचे उद्घाटन आज पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या कक्षाचा फायदा हा नक्की पोलिसांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. अगदी कोरोनाच्या विषाणूने थैमान माजवले असले तरी, शहरात तसेच गल्लीबोळात फिरून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा अवस्थेमध्ये त्यांच्या जीवाची सुरक्षा करण्यासाठी आज पोलीस आयुक्तांनी एक पाऊल पुढे टाकून नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्जंतुकीकरण कक्ष उभारून पोलिसांचे सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्याच्या आवारात निर्जंतुकीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन कामोठे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.