उरण ः प्रतिनिधी
जेएनपीटी बंदरात गेल्या 30 वर्षांत बंदराबरोबर सलग्न असणार्या अन्य चार बंदरांतून लहान-मोठे अनेक अपघात झाले, मात्र काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेला अपघात हा जेएनपीटी बंदर जेट्टीवरील सर्वात विचित्र अपघात आहे. या अपघातात ट्रेलरसह चालकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या विचित्र अपघातात चालकाला जलसमाधी मिळाल्यामुळे जेएनपीटीत कार्यरत चालक-कामगारवर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रात्री एक खासगी कंटेनर ट्रेलरवरून ओव्हर डायमेशन कंटेनर (ओडीसी) कंटेनर घेऊन एक अज्ञात चालक एनएसआयसीटी या जेएनपीटीशी संलग्न असलेल्या बंदरात उतरवून हा चालक रिकामा ट्रेलर घेऊन जेएनपीटीतून बाहेर जाण्यासाठी असलेल्या मार्गाकडे येत होता. या वेळी क्यू. सी. नं. 1 या क्रेनजवळून चालकाने डाव्या बाजूला जाण्याऐवजी तो सरळ पुढे आला. पुढे नेमके काय आहे हे समजण्याच्या आतच ट्रेलरसह चालक खोल समुद्रात पडला असून त्याचा शोध अद्याप लागला नाही. ट्रेलर केबिनमध्ये अडकून तो बुडून मरण पावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारपासून चालकासह ट्रेलरचा शोध जेएनपीटीकडून घेण्यात येत आहे. ट्रेलर नेमका कुठल्या दिशेत बुडाला याचा शोध जेएनपीटीचे अग्निशमन दल, सीआयएसएफ दल, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी घेत असताना सदरचा कंटेनर बुडाल्याची जागा सापडली. काही तांत्रिक अडचणी दूर करून मोठ्या क्रेनच्या साहाय्याने बुडालेला ट्रेलर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रेलर बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारी क्रेन जेएनपीटीने तत्काळ मागवली. ट्रेलर कसा बाहेर काढावा याबाबत अजूनही तांत्रिक मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. अधिक तपास जेएनपीटी प्रशासनासह न्हावाशेवा पोलीस करीत आहेत.