मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना विषाणूची महामारी शहरांपासून वाड्या-पाड्यांपर्यंत पोहचू नये, म्हणून जिल्हाबंदी-गावबंदी देखील करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणादेखील 144 कलमाखाली संचारबंदीचे काम काटेकोरपणे चोख बजावत आहेत. ग्रामस्थ, कामगार कर्मचारी वर्ग देखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत. याकरिता मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणार्या नागरिकांच्या शरीर तापमानाची तपासणी केली.
मोहोपाडा नवीन पोसरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे सचिव अमित शहा, डॉ. मनोज कुचेरिया, डॉ. युवराज म्हशीलकर यांच्या सहकार्याने मोहोपाडा शिवाजी चौकात व्यापारी असोसिएशनच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर चोवीस तास बंदोबस्त करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, वीजमंडल कर्मचारी व व्यापारी असोसिएशनचे सदस्य यांच्या शरीराचे तापमान थर्मामीटरमध्ये स्कॅन करून शरीर तापमानाची तपासणी करण्यात आली.
या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आल्याचे दिसून आले. एकूण 88 नागरिकांची तपासणी केली असता त्यांच्या शरीराचे तापमान शंभरपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. या वेळी सरपंच ताई पवार, रसायनी पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील व पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य रतन पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील, डॉ. मनोज कुचेरिया,
डॉ. युवराज म्हशीलकर, पत्रकारमित्र आदी उपस्थित होते.