नियमांची पायमल्ली करणार्यांवर होणार पोलीस कारवाई
पनवेल : वार्ताहर
लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, मुंबई, नवी मुंबई परिसरातून आपल्या गावी जाण्यासाठी रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी रहिवासी अवैध प्रवास करण्याच्या मागे लागले आहे. अशा अवैध प्रवासावर वॉच ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथील मॅकडोनाल्डसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर वॉच टॉवर उभे केले आहेत. या वॉच टॉवरच्या माध्यमातून मुंबई-पुणे महामार्गवर अवैध पद्धतीने प्रवास करणार्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या वॉच टॉवरमुळे पोलिसांना आता मदत होणार आहे. त्या सोबत सीसीटीव्हीची नजरदेखील या महामार्गावर राहणार आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसरातील रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा आकडा जवळपास 90च्या पुढे गेला आहे. हा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. या प्रशासनासोबत पोलीस देखील लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करीत आहे. नवी मुंबईतदेखील पोलीस यंत्रणा सतर्क असून संचारबंदीचे उल्लंघन करणार्या रहिवाशांवर चाप लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे. अशावेळी नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी करून शहरात आणि शहराबाहेर फिरणार्या रहिवाशांवर कारवाई करून घरात राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीस करीत आहे. तसेच नागरिक घरातच रहावे यासाठी नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संचारबंदीत शहरे लॉकडाऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शहरातील गर्दी कमी करण्यासाठी दुकान चालक आणि रहिवाशांना शिस्त लागावी म्हणून दुकाने सकाळी 9 ते 5 या कालावधीतच चालू ठेवण्यासाठी प्रतिबंध केला आहे. त्या सोबत शहरातून बाहेरगावी जाण्यासाठी प्रयत्न करणार्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर कळंबोलीजवळ नाकाबंदी करून प्रवास करणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये नाकाबंदीसोबत पोलिसांनी कळंबोली शहरातील मॅकडोनाल्डजवळील महामार्गावर वॉच टॉवर उभे केले आहेत. या वॉच टॉवरच्या माध्यमातून प्रवास करणार्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच वाहनांची तपासणी आणि नोंददेखील केली केली जात आहे. त्यासाठी तीन अधिकारी व 20 पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. त्यासोबत सीसीटीव्ही देखील त्यांच्या मदतीला आहेत.