वस्तू वाटपासाठी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांचे सहकार्य
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/04/Rajendra-Sharma.jpg)
कळंबोली : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या काळभैरव कळंबोली निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांना नगरसेवक राजेंद्र शर्मा स्वखर्चातून लॉकडाऊनच्या कालात अखंडीतपणे जेवण देत आहेत. त्याचबरोबर या नागरिकांना कपडे, साबण, सॅनिटायझर, मास्कचेही वाटप करण्यात आले. तळोजा औद्योगिक विभागातील झोपडपट्टीतील नागरिक, कळंबोली लोखंड पोलाद बाजारात अडकून पडलेले वाहन चालक, रोजंदारी व गरजू कामगारांनाही त्यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांचे सहकार्य मिळत आहे. कोरोनाच्या महामारीवर विजय मिळविण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये कोरोनापासून स्वत:ची काळजी घेताना प्रत्येकाने स्वत:ची दारे लावून घेतली. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी माणुसकी जपत बेघर, निराधार, मजूर, विस्थापित कामगार गरजू नागरिकांसाठी पनवेलमध्ये चार निवारा केंद्रे उभारली. त्यांना अल्पोपहार, चहा, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेने कळंबोली काळभैरव येथे उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नागरिकांना पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी स्वखर्चातून भोजन व्यवस्था केली. नगरसेवक राजेंद्र शर्मा लॉकडाऊन करण्यात आल्यापासून कोरोना विरोधात नागरिकांत जाऊन महानगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या बरोबरीने काम करीत आहेत. आदिवासीवाडी, रोजंदारी कामगार, गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूच्या रुपाने मदतीचा हात पुढे केला आहे. राजेंद्र शर्मा संपूर्ण लॉकडाऊनमध्ये कळंबोली निवारा केंद्रातील नागरिकांना जेवणाची व्यवस्था करणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शासन चौकटीत राहून त्यांच्या कार्यात मदत करताना खारीचा वाटा उचलत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक शर्मा यांनी दिली.