Breaking News

…तर सीएए, एनआरसी विरोधातील मोर्चांना चोख उत्तर देऊ : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत, त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले, तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (दि. 9) येथे दिला.

देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने रविवारी मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला अलोट गर्दी उसळली होती. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व खुद्द राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना राज यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.

’सीएए’त गैर काय, असा प्रश्न विचारत राज यांनी देशात सध्या सीएए आणि एनआरसीविरोधात जे मोर्चे काढले जाताहेत त्यांचा समाचार घेतला. तुम्हाला या देशात जितके स्वातंत्र्य मिळाले आहे तितके स्वातंत्र्य जगातील कुठल्याही देशात दिले जात नाही. त्यामुळे सुखाने राहा. उगाच सगळे बरबाद करायचा विचार करू नका, असा खरमरीत सल्ला राज यांनी संबंधितांना दिला. जे प्रामाणिक मुसलमान आहेत त्यांनीही जगजागृती करायला हवी, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.

घुसखोरांना बाहेर काढून हा देश साफ करावाच लागेल. अशी बिळे बुजवावीच लागतील. त्याबाबत इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे, असे राज म्हणाले. कोणतेही कायदे समजून न घेता आपली ताकद दाखविण्यासाठी देशात जे मोर्चे काढले जाताहेत त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलेत, असे नमूद करीत मोर्चाला प्रचंड प्रतिसाद देणार्‍या कार्यकर्त्यांचे राज यांनी आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply