कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्या रोजंदारी, मजूर व गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच यांच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांचे गरिबांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. खारघर, नवी मुंबई परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच यांच्या वतीने गरजू व्यक्तींना जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानक व आदिवासी वाड्या येथेही जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी समाजसेवक प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी दिली. यासाठी समाजसेवक महेशकुमार राऊत, यशवंत मोरे, आदित्य मोरे, दत्तात्रय धायगुडे आदी यासाठी विशेष मदत घेत आहेत.
मॉर्निंग वॉकला गेलेल्यांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर
लॉकडाऊन 3 मेपर्यंत घरातच रहावे, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले असतानाही अनेक शहरांसह ग्रामीण भागातून मॉर्निंग वॉकला जाणार्या लोकांची संख्या कमी नसल्याने त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील काळुंद्रे गावात व परिसरात मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच सकाळच्या वेळेस त्याठिकाणी जाऊन मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांविरूद्ध कारवाई करीत त्यांना सोशल डिस्टंसिंगद्वारे उठाबशा काढायला लावण्यात आल्या आहेत.
पूर्णत: लॉकडाऊनवरून खोपोलीत संमिश्र प्रतिक्रिया
खोपोली : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत 18 ते 20 एप्रिल असे तीन दिवस पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चेला उधाण आले असून अनेकांनी या निर्णयावरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खोपोली शहर 18, 19, 20 एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवा वगळून पूर्ण बंद ठेवावे याबाबत पोलीस ठाण्यात झालेल्या समितीच्या बैठकीच्या निर्णय घेण्यात आला होता, मात्र काहींना हा निर्णय रूचलेला नाही. दरम्यान, हा निर्णय प्रशासन व पोलिसांचा नसून खोपोलीकरांसाठी घेतलेला होता, असे नगराध्यक्ष यांचे प्रतिनिधी व ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांनी म्हटले आहे, तर कोरोना प्रादुर्भावासंदर्भात झालेल्या बैठकीत खोपोली बंदच्या विषयाला मी पाठिंबा दिला नव्हता. या तीनदिवसीय बंदमुळे हातावर पोट असणार्या गोरगरीब तसेच सर्वसामान्यांना यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. ज्यांना हा निर्णय घ्यावयाचा त्यांनी घ्यावा, असे आपण बैठकीत स्पष्ट सांगितल्याचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
खोपोली बंद हा निर्णय प्रशासनाचा अथवा पोलिसांचा नाही. ज्यांना किराणा सामान अथवा आवश्यक पुरवठा दुकाने उघडी ठेवायची असल्यास ती ते उघडी ठेवू शकता. त्यांना संरक्षण दिले जाईल, मात्र शासनाने घोषित केलेली संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम असणार आहे.
-धनाजी क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, खोपोली
खोपोली लॉकडाऊनचा निर्णय यापुढे सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन घ्यावा. त्याकरिता किमान दोन दिवस अगोदर प्रसिद्धीकरण करण्यात यावे.
-विजय तेंडुलकर, माजी शहर अध्यक्ष, भाजप