पनवेल : वार्ताहर
सध्याचे महाराष्ट्राचे आर्थिक परिस्थिती पाहता पुढील काही महिन्यांमध्ये आर्थिक टंचाई होण्याची शक्यता आहे, अशावेळी अनेकांनी पंतप्रधान निधीमध्ये किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये आपापल्या परीने निधी जमा केला आहे. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयमध्ये आपल्या कामाने नावाजलेले व सर्वांच्या परिचयाचे असे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय घुले यांनी आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये देऊ करून एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणू हा भयंकर आजार पसरला असून यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन हे आपली संपूर्ण ताकद लावून कोरोनाशी लढण्यासाठी देशातील तमाम नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. या करोना विषाणू व लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातील डॉक्टर्स, नर्स, पोलीस, पत्रकार बांधव हे सर्वजण जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय घुले यांच्या या मदतीचा आदर्श इतर सेवानिवृत्त अधिकार्यांनी देखील घ्यावा व पंतप्रधान सहाय्यता निधी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार जमा करावा जेणेकरून देशावर आलेल्या कोरोनाचे संकट लवकरच परतावून लावण्यासाठी हातभार लागला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ऑनलाइन सहजयोग ध्यान उपक्रम
पनवेल : वार्ताहर
लॉकडाऊनमुळे लोक घरातच आहेत. त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेली चिंता, भीती, नैराश्य आणि मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी मोफत ऑनलाइन सहजयोग ध्यान उपक्रमात विभागातील सातशेच्यावर साधक सहभागी होत आहेत. प.पू. माताजी निर्मलादेवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यानसाधनेच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षात असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साधकांना नकारात्मक, नैराश्यपूर्ण परिस्थितून बाहेर येण्यास मदत होत असून त्यांना आरोग्य, शांती, समाधान व आनंद प्राप्त होऊन ते संतुलित जीवन जगत असल्याचे रायगड जिल्हा सहजयोग समन्वक यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण त्यांच्या घरीच आहेत अशावेळी साधकांना आंतरीक शक्तीची जाणीव होण्यासाठी दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत सहजयोग ध्यान साधना विनामूल्य ध्यान ऑनलाईन माध्यमातून शिकविले जात आहे. यात सहभागासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 180030700800 वर संपर्क करावा.
पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर
बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगणार्या व्यक्तीविरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी भा. दं. वि. 188 प्रमाणे रविवारी (दि. 19) कारवाई केली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात अशाप्रकारचे पदार्थ जवळ बाळगून त्याची विक्री करण्यास मनाई असतानाही तक्का परिसरात राहणार्या भीमा दळवी या व्यक्तीने अशाप्रकारे तंबाखूजन्य पदार्थ जवळ बाळगून त्याची मोबाइलवर ऑर्डर घेऊन चढ्या भावाने विक्री करत असल्याच्या अनेक तक्रारी पनवेल शहर पोलिसांकडे जागरूक नागरिकांनी केल्या. याची दखल घेत विशेष पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत केले आहेत.