पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील कामोठे येथील एका गर्भवती महिलेचा कोरोना रिपोर्ट बुधवारी (दि. 22) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 40, तालुक्यातील 46, तर रायगड जिल्ह्यातील 58 झाली आहे.
कामोठे येथील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली गर्भवती महिला 20 एप्रिलपासून मुलुंड (मुंबई) येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिला हृदयविकाराचा त्रास असल्याचे समजते. पनवेल महापालिका हद्दीतील 489 जणांची टेस्ट केली असता त्यापैकी 422 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 27 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्हपैकी खारघरमधील दोन, कामोठ्यातील तीन आणि कळंबोलीतील नऊ असे एकूण 14 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल मनपा हद्दीतील कामोठ्यातील रुग्ण वगळता उर्वरित पनवेल तालुका तसेच उरण तालुक्यात बुधवारी एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सांगितले. दरम्यान, रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्यांचे प्रमाणही चांगले आहे.