खोपोली : प्रतिनिधी
विलगीकरण कक्षातून पळाल्याने एका व्यक्तीविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नामदेव सर्जे (वय 30, रा. शांतीनगर, खोपोली) असे त्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेत होम क्वारंटाइन केले आहे.
रमेश सर्जे हा 16 एप्रिल रोजी उरण, नवी मुंबई परिसरातून खालापूर तालुक्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून रमेशला खालापूर हद्दीतील याक पब्लिक स्कूल येथील विलगीकरण कक्षात 14 दिवस राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते, मात्र रमेश 19 एप्रिलला रात्री 8 वाजता विलगीकरण कक्षातील बाथरूमच्या खिडकीवाटे बाहेर पडला आणि शौचालयाच्या पाइपद्वारे खाली उतरून पळून गेला. याबाबत विलगीकरण कक्षाची देखरेख करणारे खोपोली नगर परिषदेचे राजेश मोते यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नगर परिषद कर्मचार्यांच्या मदतीने रमेशचा शोध घेत खोपोली शांतीनगर परिसरात टेकडीवरून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार निलेश कांबळे अधिक तपास करीत आहेत.