Breaking News

मासळी विकणार्‍या दोन बोटी जप्त; उरणच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून पुन्हा एकदा कारवाई

उरण : प्रतिनिधी

शासनाने यांत्रिकी बोटींना खोल समुद्रातील मासेमारीला बंदी घातलेली असतानाही सहा मासेमारी बोटींवर 21 जून रोजी करंजा टर्मिनल्सजवळ करण्यात आलेल्या कारवाईनंतरही या विभागातील बोटी मालकांनी पुन्हा खोल समुद्रात मासेमारी करून बंदीचे उल्लंघन करीत मासळी विक्री केली. त्या वेळी खोपटे खाडीतील रिलायन्स जेटीवर दोन ताब्यात घेण्यात आल्या. उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली आहे.

उरण तालुक्यातील खोपटे येथील खाडीत रिलायन्स जेटीवर धाड टाकून ही कारवाई बुधवारी दुपारी 1.30 वाजता  करण्यात आली आहे. या कारवाईत पेण तालुक्यातील सोनखार येथील साई- अन्नपूर्णा (बोट क्र. आयएनडी एमएच.7.एम एम.1431) व पनवेल तालुक्यातील केळवणे येथील गावदेवी प्रसन्न (बोट क्र. आयएनडी एमएच.7.एमएम 2965) या दोन खोल समुद्रात मासेमारी करून मासळी विक्री करताना आढळून आल्याने जप्त करण्यात आल्याची माहिती परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी दिली आहे.

पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलै हा कालावधी मासळीच्या प्रजननाचा असल्याने व समुद्रही  या कालावधीत मोठ्या प्रमाणात खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी बोटींना अपघात होण्याची शक्यता असल्याने शासनाकडून खोल समुद्रात मासेमारीला बंदी करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र शासनाने घातलेल्या बंदीच्या कायद्याचे पालन येथील बोटीमालक न करता आपल्या व्यासायाच्या हव्यासापोटी खलाशांचा जीवाशी खेळ खेळत असून शासनाच्या मासेमारी बंदीचा कायदा मोडून मासेमारी बंदीच्या कालावधीतही खलाशांच्या जीवाची पर्वा न करता बंदीच्या काळातही आपल्या नौका खोल समुद्रात मासेमारीसाठी पाठविण्याचे धैर्य करीत आहेत. दोन्ही बोटींनी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981चे कलम 4 नुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक बोटीद्वारे मासेमारी करून ही मासळी उरण तालुक्यातील खोपटे येथील खाडीतील रिलायन्स जेटीवर विक्रीसाठी आणल्याचे आढळून आल्याने ही कार्यवाही त्यांच्यावर करण्यात आल्याची माहिती परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी दिली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply