
श्रीवर्धन ः प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे ओस पडले असून येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी पर्यटन व्यवसायाशी निगडित असणारे घटक, हॉटेल व रिसॉर्ट मालकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे धंदा होईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे जवळजवळ दिवाळीपर्यंत सर्व पर्यटन व्यवसाय ठप्प राहणार आहे. तरी शासनाने पर्यटन व्यवसायाशी निगडित असणार्या सर्व घटकांना आर्थिक साह्य करण्याची मागणी होत आहे. एप्रिल महिन्यात शालांत परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत चाकरमानी मुंबईतून किंवा मोठ्या शहरांतून आपल्या कुटुंबासह गावाकडे कोकणात येतात. तसेच असंख्य पर्यटकही मुलांना सुटी असल्यामुळे फिरण्यासाठी बाहेर पडतात व समुद्रकिनार्यावर जाणे पसंत करतात. एप्रिल, मे व जूनच्या 15 तारखेपर्यंत चाकरमानी गावाकडेच असतात. उष्म्याचे प्रमाण वाढल्याने समुद्राच्या पाण्यात पोहणे तसेच वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही पर्यटक घेतात. श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे, श्रीवर्धन समुद्रकिनारा, दिवेआगर, आदगाव त्याचप्रमाणे हरिहरेश्वर या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे येथील पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.