अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांत बुधवारी
(दि. 29) अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शासकीय व खासगी मालमत्तेसह पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्य शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.
कोरोना विषाणूमुळे आधीच मोठे संकट उभे राहिले असताना बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वार्यासह पर्जन्यवृष्टी झाली. काही ठिकाणी गाराही पडल्या. कर्जत, खालापूर, सुधागड, मुरूड, रोहा, महाड, पोलादपूर आदी तालुक्यांत या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे घरांचे पत्रे, कौले उडून तसेच वृक्ष कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे येथे वीजवाहिनी अंगावर पडल्याने तातू जाधव हे ग्रामस्थ जखमी झाले. त्यांना कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या नैसर्गिक संकटाचा शेतपिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. भात, आंबा, काजू, सुपारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी व त्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.
सुधागडात आमदार रविशेठ पाटील यांची पाहणी;
मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार; पंचनामे तातडीने करण्याची मागणी
पाली : प्रतिनिधी
सुधागडसह जिल्हयातील अनेक आदिवासी वाड्या, ठाकुरवाड्या, धनगरवाड्या आदींना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. झालेल्या पडझडीत लाखोंचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गुरुवारी (दि. 30) रोजी पेण सुधागड रोहा मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी घोटवडे, ढोकशेत, पाच्छापूर, पंचशीलनागर, दर्यागाव आसानेवाडी व अनेक आदिवासीवाड्यापाड्यात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणेकरिता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीत ठिकठिकाणची घरे, शाळा, व मंदिरांचे पत्रे फुटले, काही ठिकाणी घरांच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. अनेक घरांना तडे गेले. विशेष म्हणजे अवकाळी पावसाने शेत मालाचे देखील अपरिमित नुकसान केले. पालेभाज्या व शेतात साठवण केलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले. आमदार रविशेठ पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्रव्यवहार करून नैसर्गिक आपत्तीची माहिती दिली. व जलद नुकसान भरपाई मिळनेसंदर्भात कार्यवाही व्हावी अशी मागणी केली. संपूर्ण सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त घरे, शाळा, शेती आदींचे पंचनामे तलाठी सजा मार्फत सुरू असून शासनाकडून नुकसान ग्रस्तांना भरपाई मिळावी याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे, असे तहसीलदार रायन्नावार यांनी यावेळी सांगितले.