Breaking News

होमगार्डशी हुज्जत; गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशानुसार साळाव चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डशी मोटरसायकलस्वाराने हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. होमगार्डने मोटरसायकलस्वाराकडे कुठे चाललास, अशी विचारणा केली असता उद्धट वर्तन व बाचाबाची करून बघून घेण्याची धमकी देणार्‍या व्यक्तीविरोधात  रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव चेक पोस्ट येथे 29 एप्रिल रोजी तेथे कार्यरत असलेले होमगार्ड सुरज गायकर यांनी साळाव येथून मोटरसायकलने रेवदंड्याकडे जात असलेले चेहेर येथील रमाकांत पाटील (50) यांना थांबवून तुम्ही कोठे जात आहात, अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग येऊन रमाकांत पाटील यांनी होमगार्ड सुरज गायकर यांच्याशी हुज्जत घालून बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत होमगार्ड सुरज गायकर यांनी चेहेर येथील रमाकांत पाटील यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार रमाकांत पाटील यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 186, 188, 509 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब) साथीचे रोग आणि 1857चे कलम 2, 3, 4 तसेच कोविड-19 उपाययोजना नियम 2020 क्र. 11च्या उल्लघंनानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत  पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.

लॉकडाऊन काळात 1500 कुटुंबीयांना धान्यवाटप

माणगाव ः प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात आजतागायत माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी माणगाव तालुक्यातील सुमारे 1500 गोरगरीब, गरजू, मध्यमवर्गीय कुटुंबीयांबरोबरच आदिवासी कुटुंबांना सढळ हस्ते जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. त्यांना अन्नधान्याचे वाटप तसेच अनेकांना परिस्थितीनुसार इतर काही गोष्टी खरेदी करण्यासाठी आर्थिक साह्यही केले. त्यांच्याकडून तालुक्यात मदतीचा ओघ सुरूच असून त्यांच्या या उपक्रमाचे तसेच त्यांच्या दातृत्वाचे तालुक्यातून कौतुक होत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे जातीने लक्ष देत आहेत. परप्रांतीय लोकांबरोबरच हलाखीचे जीवन जगणार्‍यांसाठी संजयआप्पा ढवळे हे आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत. तालुक्यातील जनतेने आतापर्यंत  प्रशासनाला जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करून आपण सर्वांनी एकजुटीच्या बळावर आपला तालुका कोरोनामुक्त ठेवू या, असे आवाहन माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply