म्हसळा : प्रतिनिधी
शहरातील शाळा नं 1 समोर असलेल्या सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र व भोला पान टपरीवर गुरुवारी (दि. 19) म्हसळा पोलीस व तालुका आरोग्य विभागाने 2003च्या कलम 24नुसार कारवाई केली. शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र म्हसळ्यातील शाळा नं 1समोर खुलेआम तंबाखूची विक्री सुरू होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश लाखे, महेंद्र रहाटे, गणेश शिरसाट, श्रीकेश पाटील तसेच पोलीस विभागाचे कैलास लक्कस, वाहतूक पोलीस अमोल निर्मळ यांच्या पथकाने गुरुवारी शाळा नं 1समोर असलेल्या सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र व भोला पान टपरीवर छापा टाकला व तेथील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दीपक डूस यांनी दिली.
शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला आहे. त्याचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
-डॉ. गणेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा