पाली : प्रतिनिधी
विहिरीतून पाणी काढणे म्हणजे खूपच मेहनतीचे काम असते. ग्रामस्थांचे हे कष्ट कमी व्हावेत व विहिरीतून सहज, मुबलक व कमी मेहनतीने पाणी काढता यावे यासाठी पाली ग्रामपंचायतीने येथील राम मंदिराजवळील विहिरीवर चक्क हॅण्डपंप बसविला आहे. अशा प्रकारचे हॅण्डपंप पालीतील इतरही विहिरींवर बसविण्यात येणार आहेत. विहिरीवर अशा प्रकारे हॅण्डपंप बसवावी ही संकल्पना ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांची होती. त्यांना श्रीकांत ठोंबरे, ग्रामस्थ विनायक भागवत व ग्रामविकास अधिकारी ए. एस. जमधाडे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. नेहमी प्रमाणे मी विहिरीवर पाणी भरायला गेलो तर तिथे हातपंप बसविलेला पाहून मी आश्चर्यचकित झालो. या विहिरीवर अनेकजण पाणी भरण्यासाठी येतात. हातपंपामुळे आता विहिरीतून पाणी सहजतेने काढता येणार आहे, असे विनय ओसवाल या तरुणाने सांगितले. तर ग्रामपंचायतीतर्फे अतिशय उत्तम सुविधा व कार्य केले असल्याचे पद्माकर फाटक यांनी सांगितले.