रोहे : प्रतिनिधी
येथील कुंडलिका नदीपात्रात बुडणार्या एका महिलेचा जीव रोहे पोलिसांनी वाचविल्याची घटना रविवारी (दि. 3) सकाळी घडली. या तत्परतेबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
कुंडलिका नदीपात्रात एक महिला बुडत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले तुषार पारवे, मनीष ठाकूर व सुनील पाटील या नाईक दर्जाच्या तिघांनी घटनास्थळी पोहचत नदीपात्रात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला पाण्याबाहेर काढले. कौसल्या गिरीधर कांबळे असे या 55 वर्षीय महिलेचे नाव असून, त्या रोह्यातील आदर्शनगर येथे राहतात. कौटुंबिक वादाच्या रागातून त्या 1 मे रोजी रात्री 8.30च्या सुमारास घरातून निघून गेल्या होत्या. याबाबत त्यांच्या मुलाने रोहा पोलीस ठाण्यात आई हरविल्याची तक्रार दिली होती. तिसर्या दिवशी सकाळी 6च्या सुमारास त्या नदीपात्रात आढळून आल्या. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच तीन कर्मचार्यांनी जाऊन नदीपात्रात तरंगत्या अवस्थेत असलेल्या महिलेला पाण्याबाहेर काढले आणि त्यांना कृत्रिम श्वास दिला. त्यामुळे महिलेला शुद्ध आली. घटनास्थळी जाण्यास वाहन नसल्याने पोलिसांनी या महिलेला खांद्यावर उचलून नदीच्या तिरावर आणले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या महिलेची प्रकृती ठीक आहे. नदीकिनारी बसलेली असताना खडकावरून पाय घसरून पात्रात पडली होती, अशी हकिकत त्यांनी सांगितली. या महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.