पेण ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण नगर परिषद हद्दीतील दुकाने वर्गवारीनुसार सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली. या वेळी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येत असून याकरिता शासनाने परवानगी दिलेल्या अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग 1 मध्ये क्लॉथ, रेडिमेड गारमेंट, सायकल, टायर, गॅरेज, स्पेअर पार्ट्स, बूट, चप्पल, प्लायवूड, ऑप्टिकल, ज्वेलर्स ही दुकाने 6, 8, 10, 12, 14 आणि 16 मे या दिवशी उघडी राहतील. वर्ग 2 मध्ये मोबाइल सेल्स, रिपेअर, रिचार्ज, स्टेशनरी, भांडी, प्लायवूड, झेरॉक्स, इलेक्ट्रीकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, लॉण्ड्री, गादी भंडार ही दुकाने 7, 9, 11, 13, 15 आणि 17 मे या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडी राहतील. या वेळी दुकानदारांनी वर्गवारीप्रमाणे दुकाने उघडी ठेवावीत. यामुळे ग्राहकांची गर्दी टाळता येईल. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्याने नागरिकांनी विनाकारण दुकानांत, रस्त्यावर गर्दी करू नये. गरज असेल तरच घरातील एकाच व्यक्तीने सामानासाठी बाहेर पडावे, तसेच दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. दुकानात सॅनिटायझर ठेवावे. दुकानातील कामगारांना मास्क व आयकार्ड द्यावीत. या सर्व नियमांचे पालन करून पोलीस यंत्रणा व प्रशासनास सहकार्य करावे तसेच नागरिकांनीही आपला तालुका व आपले शहर सुरक्षित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले.