श्रीवर्धन ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्र विजेचे पोल पडल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक अडचणींमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वादळ होऊन गेल्यानंतर बाराव्या दिवशीदेखील वीजपुरवठा नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिक अंधारातच राहत आहेत.
3 जूनला श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. निसर्ग चक्रीवादळाची भयानकता एवढी होती की अनेक विजेचे पोल उन्मळून पडले आहेत, तर काही ठिकाणी पोल बांगडीच्या आकाराप्रमाणे गोल झालेले पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धन तालुक्यात जीवितहानी झाली नसली तरी अगणित वित्तहानी झाली आहे. निसर्ग चक्रीवादळात महावितरण व महापारेषण या दोन्ही वीज कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याच्या ऊर्जा विभागाने श्रीवर्धन तालुक्याचा वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्यासाठी कंबर कसली आहे.
कांदळगाव ते पाभरे टॉवर लाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर पाभरे सबस्टेशन कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे म्हसळा शहरात वीजपुरवठा सुरू झाला, तर पाभरे ते श्रीवर्धन सबस्टेशन इनकमिंग लाइनचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. श्रीवर्धन सबस्टेशनपर्यंत नवीन उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे पोल उभे करण्यात आले आहेत. या मार्गावर विद्युत तारा खेचून झाल्यानंतर श्रीवर्धनमधील पडलेले पोल उभे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
श्रीवर्धन तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून आठ ते दहा दिवस लागतील. त्याचप्रमाणे मालेगाव व अन्य ठिकाणाहून लाइनमन श्रीवर्धन येथे काम करण्यासाठी बोलाविण्यात आले आहेत. -खांडेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, गोरेगाव