विरोधकांचा अविश्वास ठराव शासनाने फेटाळला
पनवेल : रामप्रहर वृत्त
भिंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच मछिंद्र दुर्गे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव शासनाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गे हेच उपसरपंचपदी राहणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
शेकापच्या मनमानी कारभाराला कंटाळून मच्छिंद्र दुर्गे यांनी 3 जून रोजी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला होता. हा प्रवेश शेकाप मंडळींच्या जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी राजकीय आकसापोटी अविश्वास ठरावाचा केविलवाणा प्रयत्न केला. विरोधकांनी दाखल केलेला हा अविश्वास ठराव तहसीलदार अमित सानप यांनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांची हवा गूल झाली आहे.
या निकालानंतर मच्छिंद्र दुर्गे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी माजी सरपंच सुभाष पाटील, माजी उपसरपंच योगेश लहाने, ग्रामपंचायत सदस्य मोहन दुर्गे, संजय पाटील, प्रमोद ठाकूर, नरेश पाटील, किरण दुर्गे आदी उपस्थित होते.